दापोली – ‘विद्यापीठात काम करीत असताना नेहमी सकारात्मक दृष्टिकोन बाळगा, अनेक विचार तुमच्यापर्यंत पोहोचत असतात, त्यातील योग्य तो विचार धारण करा, त्या विचारांचा ध्यास बाळगा आणि सगळयांनी एकत्रितपणे काम करा असे विचार डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या नवनियुक्त कुलगुरू मा डॉ. उज्वला चकदेव यांनी व्यक्त केले. विद्यापीठ परिवारातर्फे आयोजित स्वागत आणि शुभेच्छा कार्यक्रमात त्या अध्यक्षीय पदावरून बालेत होत्या.

याप्रसंगी व्यासपीठावर मावळते कुलगुरू मा डॉ. संजय सावंत, त्यांच्या पत्नी आणि राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणेच्या माजी संचालिका डॉ. इंदू सावंत, शिक्षण संचालक डॉ. बाळकृष्ण देसाई, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत, माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. अशोक निर्वाण, कीडा व सहशैक्षणिक उपक्रम संचालक डॉ. विठठल नाईक, विद्यापीठ अभियंता श्री. निनाद कुळकर्णी आणि नियंत्रक सौ. राजश्री जाधव उपस्थित होते.

मावळते कुलगुरू डॉ. संजय सावंत आपल्या मनोगतात म्हणाले की, “आतापर्यंत आपण सर्वांनी मला खूप प्रेम दिलत काम करताना सहकार्य केलेत त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो.

आपण विद्यापीठात बरीच नवीन कामे सुरू केली आहेत उदा. जलद प्रजनन तंत्रज्ञान, काळीमिरीची स्वतंत्र लागवड, आंबा घन लागवड, बांबू प्रक्रिया उद्योग, हळद लागवड व पक्रिया इत्यादी. ही कामे अशीच पुढे चालू राहू द्या.

मी विद्यापीठात शास्त्रज्ञांकडून बऱ्याच गोष्टी शिकलो. यापुढे आंबा घन लागवड आणि त्यापासून दरवर्षी उत्पन्न या बाबतीत मी पुढे काम चालू ठेवणार आहे, त्यामध्ये

आपले सहकार्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो” असेही ते म्हणाले. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी, शेतकरी, कर्मचारी, अधिकारी तसेच निवृत्त अधिकारी-कर्मचारी यांच्या प्रतिनीधींनी आपले मनोगत व्यक्त करून नवीन कुलगुरूने स्वागत केले आणि मावळत्या कुलगुरूंच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी नूतन कुलगुरूंचा माजी कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले तर नूतन कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांनी मावळते कुलगुरू डॉ. संजय सावंत यांचा शाल, श्रीफळ, पुष्प गुन्छ, स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला.

याप्रसंगी डॉ संजय सावंत यांचा निवृत्त कर्मचारी तसेच विद्यार्थ्याच्या वतीनेही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. प्रमोद सांवत यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. बाळकृष्ण देसाई यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. मनीष कस्तुरे यांनी केले.

कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी नूतन कुलगुरूंनी मावळत्या कुलगुरूंसोबत तसेच विद्यापीठ अधिकाऱ्यांच्या सोबत कै. बाळासाहेब सावंत यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.

त्यानंतर नूतन कुलगुरूंनी मावळत्या कुलगुरूकडून पदभार स्वीकारला. त्यानंतरच्या बैठकीमध्ये नूतन कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांनी सर्व अधिकान्यांची ओळख करून घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली.