रत्नागिरी : हिंदी सिनेमातल्या थरारपटाच्या कथेला शोभून दिसेल अशी धक्कादायक घटना रत्नागिरी शहराजवळ घडली आहे. रत्नागिरीच्या माजी पंचायत समिती सभापती स्वप्नाली सावंत यांना त्यांच्या पतीनेच जाळून ठार मारल्याची घटना शहराजवळ असलेल्या मिऱ्या इथं घडली आहे. या घटनेनं संपूर्ण रत्नागिरी जिल्हा हादरला आहे.
या खूना प्रकरणी स्वप्नाली सावंत यांचा पती सुकांत उर्फ भाई सावंत त्याचबरोबरच रुपेश सावंत आणि प्रमोद बाबू गावनांक यांनाही पोलीसांनी अटक केली आहे.
दहा दिवसांपूर्वी म्हणजेच 1 सप्टेंबर 2022 रोजी षड्यंत्र रचून स्वप्नाली सावंत यांना अटक केलेल्या तिघा आरोपींनी ठार मारले आहे, अशी पोलीसांच्या सूत्रांकडून मिळाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण रत्नागिरीमध्ये खळबळ माजली आहे.
पती सुकांत आणि स्वप्नाली यांच्यात फार जिव्हाळ्याचे संबंध नव्हते. दोघांमध्ये खटके देखील उडत होते, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. पण, या हत्येमागचं नेमकं काय कारण आहे, हे अद्याप समजू शलकेलं नाही.
या घटनेचा पोलीसांनी आठवडाभर कसून तपास सुरु ठेवला होता. यामध्ये डॉग स्कॉडचीही मदत घेण्यात आली होती. रत्नागिरी पोलीसांनी बारकाईने तपास करत या प्रकरणाचा छडा लावला आहे
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार मिऱ्या येथील भाई सावंत यांच्या घरा जवळून पोलीसांनी राख आणली होती. ती तपासासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली आहे. स्वप्नाली सावंत यांना जाळून मारल्याचा आरोप रत्नागिरी शहर पोलिसांनी ठेवला आहे.
स्वप्नाली यांना जाळून मारल्यानंतर ही राख या संशयित आरोपींनी समुद्रात टाकली होती. त्यामुळे कोणताही पुरावा पोलीसांच्या हाती लागत नव्हता. अखेर रत्नागिरी शहर पोलीसांनी आपले कौशल्य पणाला लावत या तपासात यश मिळवले आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, स्वप्नाली सावंत या दिनांक 1 सप्टेंबर पासून त्यांच्या मिया येथील घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांचे पती सुकांत उर्फ भाई सावंत यांनीच शहर पोलीस ठाण्यात केली होती.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे प्रवीण स्वामी आदी पोलीसांच्या पथकाने या तपासात मेहनत घेतली.