डॉ. प्रशांत मेहता यांचे बुधवारी पुणे येथे निधन झाल्याने दापोलीकरांचा एक आधारवड अकाली कोसळला आहे. एका झंझावाताची झालेली ही अकाली एक्झिट दापोलीकरांसाठी फार मोठी हानी असून यातून सावरण्यासाठी बराच कालावधी जावा लागेल.

डॉ. प्रशांत मेहता व्यवसायाने शल्यचिकित्सक असले तरीही त्यांचे व्यक्तिमत्व या व्यवसायापुरते मर्यादित नव्हते. सामाजिक, शैक्षणिक, सहकार, क्रीडा या सर्व क्षेत्रात डॉ. मेहता यांचा कायमस्वरूपी प्रभाव राहिला.

२५ जानेवारी १९५७ जन्मलेल्या यांनी पब्लिक स्कुल, सातारा, नंतर पारले काँलेज, मुंबई असा शिक्षणाचा श्रीगणेशा केल्यावर १९८५ मध्ये ग्रान्ट मेडिकल काँलेज, मुंबई मधुन एम.एस. चे शिक्षण पुर्ण केले.

वैद्यकीय व्यवसाय करतानाच त्यांनी सामिजिक जाणीवेचा कुटुंबातून आलेला वारसा शेवटपर्यंत जपला. दापोली एज्यूकेशन सोसायटीचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. लायन्स क्लब, डॉ. इंदिराबाई वामन बडे कर्णबधिर विद्यालयाची धुराही त्यांनी समर्थपणे सांभाळली.

दापोली अर्बन को. ऑप. बँक, दापोलीचे ते आज पर्यंत संचालक होतेच पण मध्यंतरीच्या काळात त्यांनी या बँकेचे अध्यक्षपद देखील सांभाळले होते. जॉली स्पोर्टस क्लब, दापोली तायक्वांडो अकॅडमी अशा संस्थांवरही आपली छाप उमटवली.

ते १९८६ मध्ये लायनिझम मध्ये सक्रीय झाले, त्यानंतर १९१० ते १९९१काळात अध्यक्ष, १९९३-१९९४ काळात झोन चेअरमन, १९९६-१९९७ काळात रिजनल सेक्रेटरी, १९९९-२००० मध्ये रिझनल चेअरमन तर २००१ पासुन कॅबीनेट ऑफिसर अशी वेगवेगळी पदे भुषवली.

वैद्यकीय व्यवसाय करताना डॉक्टर मेहता यांनी सामाजिक बांधिलकी जपली. अनेक रुग्णांशी त्यांचे अत्यंत जवळचे ऋणानुबंध निर्माण झाले होते.

काहीसे फटकळ, रागीट, स्पष्टवक्ते असलेल्या डॉ. मेहता यांच्या या स्वभावाचा प्रसाद काही जणांना मिळाला असला तरी त्यांच्या आणि डॉ. मेहता यांच्या संबंधांमध्ये यामुळे कधीही कटुता निर्माण झाली नाही.

प्रत्येकाच्या अडचणीला धावून जाणे, वेळप्रसंगी आर्थिक मदत करणे ही डॉ. मेहता यांची खासियत होती.
अनेक एक वैद्यकीय व्यावसायिकांची कारकीर्द डॉ. मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली आणि बहरली देखील.

अत्यंत किचकट शस्त्रक्रिया करण्याची हातोटी त्यांच्याकडे होती. डॉ. प्रशांत मेहता यांचा मुलगा डॉ. कुणाल मेहता हा वारसा समर्थपणे सांभाळत आहे. ही दापोलीकरांसाठी एक जमेची बाजू आहे.

माझा आणि डॉ. मेहता यांचा संबंध मी दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये २००० साली मी प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यावर सर्वप्रथम आला. त्यावेळी डॉ. मेहता दापोली एज्युकेशन सोसायटीचे त्यावेळी अध्यक्ष होते.

एकंदरीत व्यवस्थापनावर त्यांची जरब होती. त्यामुळे त्यांच्याबद्दल एक भीतियुक्त आदर वाटायचा. पण कालांतराने त्यांच्याशी जसाजसा संबंध वाढत गेला तशी तशी त्यांच्याविषयीची भीती कमी होऊन आदर वृद्धिंगत होत गेला.

त्यावेळी आमचे महाविद्यालय विनाअनुदानित होते. अनेक आर्थिक अडचणींचा सामना करत महाविद्यालय उभे राहण्याचा तो कालखंड होता. स्वाभाविक: अनेक गैरसोयी देखील त्या वेळी होत्या.

विज्ञान महाविद्यालय चालवणे आणि ते देखील विनाअनुदानित हे म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखे होते. दापोली एज्युकेशन सोसायटीचे तत्कालीन संचालक हे शिवधनुष्य पेलत होते.

त्यावेळचा एक प्रसंग आठवतो. मुलामुलींसाठी स्वच्छतागृहांची वेगळी व्यवस्था त्यावेळी उभी राहिलेली नव्हती. यासाठी मुलांनी संप केला होता. मुले ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. मात्र यावेळी डॉ. मेहता यांनी केलेली यशस्वी मध्यस्थी कामी आली आणि संप मिटला.

सर्व संचालकांच्या या प्रयत्नाने वर्षभरात स्वच्छतागृह देखील उभे राहिले. अत्यंत कठीण परिस्थितीत समूहाला कसे सामोरे जावे लागते, याचा हा वस्तुपाठ होता. दापोली अर्बन बँकेच्या अनेक सर्वसाधारण सभेमध्ये डॉ. मेहता यांनी अशीच भूमिका पार पाडली.

दापोली एज्युकेशन सोसायटी मधून डॉ. मेहता बाहेर पडल्यावर देखील त्यांचा मला कायमस्वरूपी वैयक्तिक एक आधार वाटत राहिला.

माझ्या अपघाताच्या वेळी धावून आलेले, माझ्या घराच्या वास्तुशांती वेळी लांब कुठेतरी गाडी पार्क करून दुपारच्या रणरणत्या उन्हात माझे घर शोधत आलेले डॉक्टर आजही आठवतात.

त्यांच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून माझा सतत संपर्क असायचा ते देखील संपर्क साधत असायचे त्यामुळे थेट भेट जरी झाली नाही तरी हा संपर्क एक आधाराचाच भाग होता.

डॉ. मेहता यांना ज्यावेळी असाध्य रोगाने गाठले. त्यावेळी याला समर्थपणे भिडण्याची त्यांची वृत्ती होती. मात्र काही महिन्यापूर्वी अचानक पणे त्यांच्या पत्नीचे झालेले निधन डॉक्टरांसाठी फार मोठा धक्का होता.

यानंतर डॉक्टर फार भावनीक झाले. यावेळी भेटायला गेल्यावर ‘मीच जायचा होतो पण ही माझ्या अगोदर गेली!’, ही त्यांची मनस्थिती सांगणारी अतिशय बोलकी प्रतिक्रिया होती. यानंतर यातून ते सावरले नाहीत.

केमोथेरपी, वेगवेगळी ऑपरेशन याने त्यांची प्रकृती नंतर खालावत गेली आणि काल त्यांच्या निधनाने त्यांची नियतीशी सुरू असलेली झुंज संपली. काही महिन्यांमध्ये डॉ. मेहता यांच्या कुटुंबियांना बसलेले हे दोन धक्के अत्यंत दुर्दैवी असून यातून सावरण्याचे बळ डॉ. कुणाल, तेजस आणि कुटुंबीयांना लाभो ही प्रार्थना.

– कैलास गांधी, दापोली (7620444780)