दापोली : शहरातील खोंडा भागातील हरवलेल्या मुली तब्बल आठवड्यानं सुखरूप सापडल्यानं पालकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
निया तळघरकर आणि अल्फिया ऐनरकर या तरुणी ३० मार्च रोजी हरवल्याची तक्रार त्यांच्या पालकांनी दापोली पोलीस स्थानकात केली होती. सोशल मीडियावर त्यांचे फोटो टाकून, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्या चौकशी करूनही त्यांचा पत्ता लागत नव्हता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा पदाधिकारी इनायत तळघरकर यांनी या प्रकरणामध्ये विशेष कष्ट घेतले. त्यांनी मुंबईत जाऊन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन या प्रकरणचं गांभीर्य सांगितलं. त्यानंतर सूत्रं हालली आणि तपासाला वेग आला.
यासाठी विरार महिला अध्यक्ष रूपाली लोंढे यांची मदत लाभली. गृहमंत्र्यांबरोबरची भेट यांनी घडवू दिली. त्यायबरोबर या केसमध्ये त्यांनी खूप फॉलो अप घेतला.
दरम्यान, दापोली पोलीसांनी या घटनेवर बारीक लक्ष ठेऊन तपासकाम सुरू ठेवलं होतं. मोबाईल नसल्यानं त्यांचं ठिकण शोधणं तसं आव्हानात्मक होतं.
पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांच्या सुचनेनंतर उपनिरीक्षक शितल पाटील यांनी तपास करून या युवतीना मुंबई येथून ताब्यात घेतलं.
या दोन्ही तरूणींना मुंबई येथून दापोलीमध्ये आणण्यात आलं आहे. या मुलीच्या पालकांनी पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, दापोली पोलीसांचे आणि इनायत टेटवलकर यांचे आभर मानले आहे.
या दोन्ही मुली नोकरी शोधण्यासाठी घरातून निघाल्या होत्या, असं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे.