निरभ्र आकाश आणि देशाच्या उत्तर-पश्चिम भागातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यात उन्हाचा चटका कायम आहे. विदर्भात उष्णतेची लाट आली असून, ती आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश भागात दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. मुंबई परिसरासह कोकण विभागातील किमान तापमान अद्यापही सरासरीपुढे आहे.
पुढील दोन दिवसांनंतर मात्र तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. राज्यात १३ मार्चपासून तापमानातील वाढ सुरू झाली होती.
राजस्थानपासून गुजरातपर्यंत असलेल्या उष्णतेच्या लाटेचा परिणाम म्हणून मुंबई परिसरासह कोकण विभागात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली होती.