दापोली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकानजीक उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण युवासेनाप्रमुख व राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते २९ मार्चला करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार योगेश कदम यांनी दिली.दापोली तालुक्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचा असलेला विषय मार्गी लागला आहे. नगरपंचायतीला कंपन्यांनी दिलेल्या सीएसआर फंडातून दिलेल्या निधीतून हा पुतळा तयार केला आहे. तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी ८० लाखांचा निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत दिला होता.
त्यातून या परिसराचे सुशोभीकरणाचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी एक कोटी रुपये दिले असून, त्यातून शिवसृष्टी उभारण्याचे दुसऱ्या टप्प्याचे काम हाती घेतले जाणार असल्याचे आमदार कदम यांनी सांगितले. युवासेनाप्रमुख व राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण व्हावे, अशी आमची सर्वांची इच्छा होती. विधिमंडळाच्या अधिवेशनात आपण आदित्य ठाकरे यांची भेट घेतली असून त्यांनी दापोलीत येण्याचे मान्य केल्याचे कदम यांनी सांगितले.