मुंबई :-ऐन उन्हाळ्याच्या सुरूवातीला राज्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या दोन ते चार दिवसात मराठवाड्यात अवकाळी पाऊस तर इतर ठिकाणी ढगाळ हवामान असण्याचा अंदाज आहे.

राज्यात अवकाळी पाऊस तसेच वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाची शक्यता आहे. परंतू पावसाचा पिकाला फटका बसू शकतो. काढणीला आलेल्या गहू, हरबरा, ज्वारी सारख्या पिकांना अवकाळीचा जबर फटका बसू शकतो. 

त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी काढणी पूर्ण केली असल्यास त्यांनी आपली पिके झाकून ठेवावी असं आवाहन करण्यात आलं आहे.

राज्यातील नाशिक, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये येत्या तीन ते चार तासांत सोसाट्याचा वारा, वादळ, विजांचा कडकडाट आणि जोरदार मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. याशिवाय ७ व ८ मार्च रोजी आकाश ढगाळ राहणार आहे. तर, ८ मार्चला औरंगाबाद, जालना, परभणी, बीड आणि हिंगोलीमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्‍या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.