पारदर्शक कारभाराचा नुसताच आव
दापोली- दापोली नगरपंचायतीच्या काल झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत पत्रकारांना सभेचे वार्तांकन करण्यासाठी नगराध्यक्षा ममता मोरे यांनी मज्जाव केला व शिवसेना राष्ट्रवादी आघाडीने असा निर्णय घेतला असून सभेनंतर पत्रकारांना माहिती दिली जाईल असे त्यांनी सांगितले.
दापोली नगरपंचायतीच्या सर्वसाधारण तसेच विशेष सर्वसाधारण सभेचे वार्तांकन करण्यासाठी पत्रकारांना अनेक वर्षे परवानगी होती, मात्र नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवणुकीत शिवसेना राष्ट्रवादी आघाडीला बहुमत मिळाले असून आमचा कारभार पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त असेल अशी घोषणा निवडून आलेल्या नगरसेवकांनी केली होती.
दुपारी 11.30 वाजता नगराध्यक्ष दालनात दापोली नगरपंचायत सन 2021/22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प पुनर्विनियोजन करणे व सन 2022/23 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पास मंजुरी देणे या विषयावर चर्चा करणेसाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते.
नेहमीप्रमाणे काही पत्रकार या सभेसाठी नगराध्यक्ष दालनात बसले असता सभा सुरु होण्याअगोदर नगराध्यक्ष ममता मोरे यांनी शिवसेना- राष्ट्रवादी आघाडीमध्ये ठरल्यानुसार नगरपंचायतीच्या सभेमध्ये पत्रकारांना वार्तांकन करण्यासाठी बसता येणार नाही असा निर्णय झाला असून सभा संपल्यावर सभेत काय निर्णय घेण्यात आले त्याची माहिती देण्यात येईल असे सांगितले. यामुळे दालनात बसलेले पत्रकार दालनातून बाहेर पडले.