राज्य प्रशासनाला गृहित धरत नसल्याने विद्यापीठाचा विकास होत नाही. विद्यापीठ हे स्वायत्त असल्याने राज्य प्रशासन त्यांच्याशी संपर्क ठेवत नाही. मात्र, विदयापीठाने राज्य प्रशासनाशी संपर्क ठेवून संयुक्तपणे काम करण्याची गरज आहे. त्यामुळे विद्यापीठाचा आणि विद्यार्थ्यांचाही विकास होईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. कवियत्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात आज (शनिवार) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
विद्यापीठातील विद्यार्थी, पालक कर्मचारी, प्राध्यापक यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आयोजित या मेळाव्याला जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, कुलगुरू ई. वायुव नंद, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, आमदार संजय सावकारे आदी उपस्थित होते.
मंत्री उदय सामंत म्हणाले की २४ तासापूर्वी पालकमंत्र्यांना निमंत्रण मिळाले त्यांनी एक कोटी दिले. जर हेच निमंत्रण माझ्या दौऱ्याबरोबर त्यांना मिळाले असते, तर ८ कोटी रुपये मिळाले असते, असा टोला त्यांनी उत्तर महाराष्ट्र विभागाच्या प्रशासनाला लगावला. जरी विद्यापीठ हे स्वायत्त संस्था असली तरी त्यांनी प्रशासन व पालकमंत्र्यांना विश्वासात घेतले, तर विद्यापीठाचा विकास अधिक चांगला होईल.
प्राध्यापकांचे प्रश्न सुटले पाहिजे, शिक्षकांचे प्रश्न सुटले पाहिजे, या मताचे आम्ही सुद्धा आहोत. पण ज्यांच्यासाठी आपण काम करीत आहोत. त्या विद्यार्थ्यांसाठी काय करीत आहोत, याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. महाविकास आघाडी सरकारने २८८ प्राध्यापकांच्या भरतीचा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यपाल जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, माझ्याकडे जास्त तक्रारी तुम्ही मांडल्या, त्या खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे मांडल्या तर अधिक चांगला न्याय मिळू शकतो. सिनेट सदस्यांनी त्यांची भेट घेऊन आपल्या समस्या व तक्रारी त्यांच्याकडे मांडाव्या, अशाही सूचना सामंत यांनी दिल्या.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुतळ्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून १ कोटी निधी देण्याचे जाहीर केले. विद्यापीठात काम करणाऱ्या कर्मचारी व प्राध्यापक यांचे अपघाती निधन झाले आहे. त्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात आली.