दापोली:- शेती व ग्रामीण उद्योगाकरीता उद्योजकता विकसीत करण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात ‘अपारंपरिक उर्जेचा शेतीसाठी व ग्रामीण उद्योगाकरीता उपयोग’ या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यंदा डॉबासाकोकृवि सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. २१ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे मंगळवारी उद्याटन करण्यात आले.
अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत विभाग, कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली व भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकता विकसित करण्यासाठी ‘अपारंपरिक उर्जेचा शेतीसाठी व ग्रामीण उद्योगाकरीता उपयोग’ या विषयावर एकवीस दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येत आहे. 07 मार्चपर्यंत चालणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये 20 प्रशिक्षणार्थींनी नोंदणी केली आहे.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्या हस्ते मंगळवारी कार्यशाळेचे उद्याटन झाले. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, शिक्षण संचालक डॉ. सतिष नारखेडे, कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. यशवंत खंडेतोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर प्रशिक्षणास भारतातील जम्मु व काश्मिर, तामिळनाडू, कर्नाटक, गोवा, राजस्थान, पंजाब सह महाराष्ट्रातील नामांकित कृषि संस्थेतील शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत. सदर प्रशिक्षणाचे आयोजन अपारंपरिक ऊर्जास्त्रोताची माहिती प्रशिक्षणार्थींना देण्याकरिता अपारंपरिक ऊर्जास्रोत विभागाचे प्राध्यापक व प्रमुख डॉ. किशोर धांदे, सहाय्यक प्राध्यापक सौ. पुनम चव्हाण, श्री. मयुरेश पाटील यांनी दिली तर आभार सौ. पुनम चव्हाण यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैभव पिंपळकर, संतोष भुवड, शेखर कोकमकर, प्रथमेश गिम्हवणेकर आदींनी परिश्रम घेतले.