कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टला महाराष्ट्रात जागा मिळणार आहे. त्यासंदर्भात देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी महिनाअखेरीस मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टची बैठक नुकतीच पार पडली. त्यात ट्रस्टचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बा रेड्डी आणि अन्य पदाधिकाऱ्यांसह ट्रस्टचे सदस्य शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हेसुद्धा उपस्थित होते. तिरुमला तिरुपती देवस्थानात दर्शनासाठी महाराष्ट्रातून लाखो भाविक येतात. त्यांना देवस्थानासंदर्भात सर्व माहिती उपलब्ध व्हावी म्हणून माहिती केंद्र उभारण्याचा ट्रस्टचा मानस आहे. त्यासाठी जागा देण्यास महाराष्ट्र सरकार अनुकूल आहे. त्याचसंदर्भात ट्रस्टचे पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सुब्बा रेड्डी यांनी या बैठकीत सांगितले.