महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत आता दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे राज्यात सध्या लागू असलेले निर्बंध लवकरच शिथिल करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील निर्बंध शिथिलतेवर तिक्रिया दिली आहे. तसेच महाराष्ट्र मास्क मुक्त होणार का? यावरही त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे.
टोपे म्हणाले, आज लगेचच महाराष्ट्र आणि देशात मास्कमुक्ती केली पाहिजे असं अजिबात नाहीये. पण इतर काही देशांमध्ये या संदर्भातील निर्णय का घेतला? त्याच्यामागचं शास्त्र काय आहे? पाश्चिमात्य देशांनी मास्क फ्री केल आहे. याचा अभ्यास करण्याची गरज आहे.
या संदर्भातील सर्व माहिती आपण संकलित करत आहोत. इतक्या मोठ्या लोकशाही असलेल्या देशात तात्काळ मास्कमुक्ती करुन कुठलंही संकट ओढवायचं नाहीये. त्यामुळे तुर्तास मास्कमुक्ती शक्य नाही. निर्बंध शिथिल केले जातील. सिनेमागृह, नाट्यगृह यांच्यातील 50 टक्के क्षमतेचे निर्बंध शिथिल करण्याची कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येईल.
राज्य सरकारने आधीच जानेवारी महिन्यात लागू केलेले निर्बंध हटवले आहे. पण आता फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्र पूर्णपणे अनलॉक केला जाईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.