दापोली:-दापोली एसटी आगारात मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास बसमध्ये डिझेल चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संशयित अज्ञात चोरट्याविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दापोली पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार 31 जानेवारी रोजी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास दापोली आगारातील उभी असलेली बस (क्र. एम. एच. 20 बी एएल -1590 ही गाडी उभी असताना अज्ञाताने बस गाडीचे डिझेल टाकी उघडून त्यातील डिझेल चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षारक्षकाची चाहूल होताच त्याने तिथून पळ काढला. या घटनेचे साक्षीदार म्हणून एसटी बस कर्मचारी अमृत झिंगे, मृदुला जाधव यांनी आपली साक्ष नोंदवली आहे. या घटनेची खबर दापोली पोलिस ठाण्यात सुरक्षारक्षक विजय पाटील यांनी दिली आहे. या संदर्भात अधिक तपास हेड कॉन्स्टेबल गुजर हे करीत आहेत.