रत्नागिरी : खेड लोटे एम.आय. डी.सी. मध्ये आधुनिक रेल्वे कोच (डबे) व रेल्वे व्हिल बनवण्याचा कारखाना माजी केंद्रीय रेल्वे मंत्री, खासदार सुरेश प्रभू यांनी मंजूर केला. हा प्रकल्प ४५० कोटींचा हा प्रकल्प असून दोन टप्पे पूर्ण होत आले आहेत. पुढील सहा महिन्यांत प्रकल्प पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हजारो युवकांना रोजगार मिळणार असून कोकणच्या विकासात आणखी एक टप्पा पार होणार आहे. प्रभू यांनी रेल्वेला आत्मनिर्भर बनवत दर्जेदार कामगिरी सुरू केली.

या प्रकल्पाचे काम कोकण रेल्वे कार्पोरेशन खंड न पडता करत आहे. कारण यांची आर्थिक तरतुद प्रभूंनी पहिल्यांदाच करून ठेवली आहे. या कारखान्यात २०२२ ते २०२३ मध्ये उत्पादन करण्यास सुरवात होईल. केंद्र सरकारचा प्रत्यक्ष सहभाग असणारा कोकणातील पहिलाच प्रकल्प साकारत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात एकहाती सत्ता आली. त्यावेळी सुरेश प्रभू यांचा भाजपामध्ये प्रवेश करून घेऊन रेल्वे मंत्रीपद बहाल करण्यात आले. त्यावेळी रेल्वे आर्थिक विवंचनेत होती. परंतु सुरेश प्रभुंनी रेल्वेला आधुनिकतेची जोड देत रेल्वेचा पूर्ण चेहराच बदलून टाकला. हे समीकरण जळवून आणून जगाचे लक्ष रेल्वेकडे आकर्षित केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक जागतिक दर्जावर सुरू झाली व आधुनिकतेचे तंत्रज्ञान भारतात येऊ लागले.

कोकण रेल्वेचे विद्युतीकरण, दुपदरीकरण, रेल्वे स्टेशनचे आधुनिकरण, सावंतवाडी मळगाव टर्मिनल, सर्व स्टेशन वर कोकणी मेव्याचे स्टॉल, नवीन स्टेशन, सोलर विद्युतीकरण असे सर्वसामान्य कोकणी माणसाला आवश्यक असणाऱ्या सुविधा देताना आर्थिक हातभार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कसा लागेल, याकडे खासदार प्रभू यांनी विशेष लक्ष दिले आहे. श्री. प्रभू यांनी लोटे, लवेल येथील ४५ एकर जमीन केंद्र सरकारच्या अखत्यारीत घेऊन रेल्वेच्या ताब्यात दिली. या प्रकल्पामुळे कोकणाच्या पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचा धक्का लागणार नाही पण मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे. यामध्ये वेल्डर, मोलडींग टेक्निशियन, वायरमन, रंगारी, प्लंबर, फोम मेकर, फिटर यांना रोजगाराची संधी उपलबध होणार आहे. तंत्रनिकेतन (ITI)मध्ये प्रशिक्षण घेतलेल्यांना रोजगार मिळणार आहे.

हा रेल्वेचा शाश्वत प्रकल्प आहे. जोपर्यंत रेल्वे आहे तोपर्यंत हा प्रकल्प चालू राहणार आहे. श्री. प्रभू रेल्वे मंत्री असताना रेल्वे कोच आयात केले जात होते. मोदींनी मेक इन इंडिया, स्टार्टप इंडिया नारा दिला. यांचा प्रभुंनी रेल्वेत उपयोग करून घेतला. रेल्वे कोच दुरुस्तीचे कारखाने कोच बनवु लागले. त्याला चालना प्रभुंनी देऊन ज्या ठिकाणी चीन वर्षाला १२०० कोच बनवत होते तेथे भारत वर्षाला १३१८ कोच बनवून जागतिक क्रमवारीत एक नंबरला गेला. रेल्वे कोच निर्यात करू लागला.