दापोली :- खैर, सागवान आदी काही महत्वाची झाडे संरक्षित वनयादीत मोडतात,वनविभागाच्या परवानगी शिवाय या झाडांची तोड करणे गुन्हा आहे. मात्र तरीही या नियमांना हरताळ फासत अवैधरित्या वृक्षतोड करून जंगले संपवण्याचा उद्योग कोकणात काही ठिकाणी छुप्या पद्धतीने केला जातो. असाच एक प्रकार कोकणात रत्नागिरी जिल्हयात दापोली तालुक्यात चिखलगाव मळे परिसरात चालू होता.या सगळ्या विषयी सावित्री भिकू पांदे,लक्ष्मी सहदेव पांदे , दोन्ही रा.वरचीवाडी , मळे , ता.दापोली यांनी दाभोळ सागरी पोलीस ठाणे येथे तोंडी तक्रार दिली होती. याची दखल घेत दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या पथकाने प्रभारी पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ, पो.हे.कॉ. राजू मोहिते, पो.हे.कॉ शिंदे, पो.ना. सागर कांबळे, पो.ना जानवलकर यांच्या पथकाने जंगल परिसर पिंजून काढत हा सगळा प्रकार रंगेहाथ पकडून उघडकीस आणला आहे. जंगलात खैराच्या लाकडाची अवैधरित्या तोड करताना दोन संशयितांना दाभोळ पोलिसांनी पकडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तीन संशयितांना सुमारे २५ हजार रुपयांच्या खैराची लाकडे मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आली आहेत.
याप्रकरणी संशयित वियज सुदेश येलवे  वय २७ वर्षे , रा.आगरवायंगणी,राजेंद्र पांडुरंग तेलप वय ४५ रा.मळे ,  अशोक गंगाराम करबेळे रा.आगरवायंगणी मधलीवाडी  हे संशयित इसम तोडलेल्या खैराची लाकडे नेण्याचे उददेशाने जंगलमय भागात संशयास्पद रित्या दोन कुऱ्हाडी,दोन टिकाव ,एक फावडे , तीन कोयत्या या हत्यारांसह ताब्यात घेण्यात आले आहे. यावेळी पोलीसांच्या पथकाने चौकशी केली करता यावेळी तोडलेली खैराची लाकडे नेण्यासाठी आम्ही जंगलात आल्याची कबूली दिली. पोलिसांनी या सगळ्या घटनेची माहिती तात्काळ दापोलीच्या उपविभागीय परिक्षेत्र कार्यालयाला दिली आहे. वनपाल श्री.सावंत,श्री.जळणे यांनी घटनास्थळी येऊन लेखी पंचनामा करून सुमारे २५ हजार रुपये किंमतीची खैर झाडाची लाकडे व  संशयित तीन इसमांसह त्यांचेकडील हत्यारासह त्यांना वनविभागाच्या ताब्यात घेतले आहे. पुढिल कार्यवाही दापोली उपविभागीय परीक्षेत वनविभागाकडून सुरु करण्यात आली आहे.