राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण वेगाने होत असले तरी सुमारे १ कोटी ४१ लाख नागरिकांनी लसीची पहिली मात्राही घेतलेली नाही. यात सर्वाधिक १३ लाख ८३ हजार नागरिक ठाणे जिल्ह्यातील आहेत. या खालोखाल नाशिक, जळगाव, नगर आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव नोव्हेंबरमध्ये कमी झाल्यानंतर लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी कमी होत गेली. परंतु डिसेंबरमध्ये ओमायक्रॉनच्या भीतीने पुन्हा लसीकरणासाठी गर्दी वाढू लागली.

जानेवारीपासून सुरू झालेल्या या लसीकरण मोहिमेत सर्वाधिक दैनंदिन सरासरी लसीकरण डिसेंबरमध्ये झाले आहे. या काळात रोज सरासरी ८ लाख ७९ हजार नागरिकांना लस देण्यात आली. लसीकरणाचा वेग वाढला असला तरी अजूनही राज्यात १५ टक्के नागरिकांना लयीची पहिली मात्रा देणे बाकी आहे.

राज्यात पहिली मात्रा न घेतलेले सर्वाधिक नागरिक ठाण्यात आहेत. यानंतर नाशिकमध्ये सुमारे ११ लाख ४० हजार, जळगावमध्ये सुमारे ८ लाख ५६ हजार, नगरमध्ये सुमारे ८ लाख ४५ हजार आणि नांदेडमध्ये ८ लाख १६ हजार नागरिकांनी पहिली मात्रा घेतलेली नाही.

रत्नागिरी, वर्धा, भंडारा आणि सिंधुदुर्ग वगळता अन्य सर्व जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण एक लाखांहून अधिक आहे.

पहिली मात्राही न घेतलेल्या नागरिकांची सर्वात कमी संख्या सुमारे ३० हजार सिंधुदुर्गमध्ये आहे.

कोविनच्या आकडेवारीनुसार तर मुंबईत पहिल्या मात्रेचे लसीकरण १०६ टक्क्यांवर गेले आहे.