राज्यातील विविध शासकीय विभागातील रिक्त पदांच्या भरतीसाठी भविष्यात होणाऱया स्पर्धा परीक्षा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), एमकेसीएल व आयबीपीएस या संस्थांच्या माध्यमातूनच घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. म्हाडामध्ये कार्यकारी अभियंता, उप अभियंता, व्यवस्थापक, प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक अभियंता, सहाय्यक विधी सल्लागार अशा विविध 565 विविध रिक्त जागांसाठी मागील रविवारी परीक्षा घेण्यात येणार होती. पण या भरती परीक्षेचा पेपर फुटल्याने परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे जाहीर केला होता.

त्यानंतर यापुढे परीक्षा पारदर्शकपणे घेण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेससारख्या संस्थांची मदत घेण्यात येईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती.