पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विटर हँडल रविवारी काही वेळासाठी हॅक करण्यात आलं होतं. ट्विटर अकाऊंट काही वेळाने पुन्हा सुरळीत करण्यात आलं. मात्र अकाऊंट हॅक केल्यानंतर काही वेळातच हॅकर्सनी क्रिप्टोकरन्सीला प्रोत्साहन देणारं एक ट्वीट केलं होतं. नंतर हे ट्वीट डिलीट करण्यात आलं.
पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट करत यासंबंधी माहिती दिली आहे. “‘पंतप्रधानांचं ट्विटर हँडल @narendramodi सोबत छे़डछाड करण्यात आली होती. ट्विटरला याची माहिती देण्यात आली असून अकाऊंट तात्काळ पुन्हा सुरक्षित करण्यात आलं आहे. छेडछाड करण्यात आलेल्या काळात करण्यात आलेल्या ट्वीटकडे दुर्लक्ष करा,” असं पंतप्रधान कार्यालयाने सांगितलं आहे.
अकाऊंट पुन्हा सुरक्षित करण्याआधी पंतप्रधान मोदींच्या ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये बिटकॉईनला मान्यता देण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. “भारताने बिटकॉईनला कायदेशीर मान्यता दिली आहे. भारताने ५०० बिटकॉईन खरेदी केली असून देशातील लोकांना वाटत आहे,” असं या ट्वीटमध्ये सांगण्यात आलं होतं.
याआधी सप्टेंबर २०२० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची खासगी वेबसाईट हॅक करण्यात आली होती. यावेळी क्रिप्टोकरन्सीसाठी विनंती करणारे ट्वीट पोस्ट करण्यात आले होते. narendramodi_in या हँडलवर एकामागोमाग करण्यात आलेल्या ट्वीट्समध्ये पंतप्रधान मदत निधीसाठी पुढाकार घेण्याचं आवाहन करताना भारताने आता क्रिप्टोकरन्सीला सुरुवात केली असल्याचं सांगण्यात आलं होतं. काही मिनिटांनी हे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आल्याचं ट्वीट हॅकरने केलं होतं. नंतर हे ट्वीट्स डिलीट करण्यात आले होते.