दापोली : राजकारणामध्ये कधीही, केव्हाही आणि काहीही होऊ शकतं याची प्रचिती वारंवार येतच असते. महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस एकत्र येतील असं जर तीन वर्षांपूर्वी कोणी सांगितलं असतं तर विश्वास बसला नसता. पण महाराष्ट्रामध्ये ते शक्य झालं आणि महा विकास आघाडीचे सरकार सत्तेत आलं.
हे एवढं सांगण्याचं कारण असं की, सुर्यकांत दळवी जे दापोलीचे पाच वेळा निवडून आलेले आमदार होते ते पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहेत.
गेल्या काही वर्षांपासून राजकीय विजनवासात असलेले सुर्यकांत दळवींवर दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीत महत्त्वाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे.
या विषयावर आम्ही त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे. ते असं म्हणाले की, “येत्या नगरपंचायत निवडणुकीत पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारायला मी तयार आहे.”
राजकारणामध्ये काही होऊ शकत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. सुर्यकांत दळवी हे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरुवातीच्या काळात होत होती. ती चर्चा थंड पडते न पडते सुर्यकांत दळवी हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा होऊ लागली. सध्या जी माहिती समोर येते आहे ती अशी की, शिवसेना पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर नवीन जबाबदारी सोपवण्याच्या तयारीत आहे.
दापोली नगरपंचायतीच्या माध्यमातून त्यांच्या राजकीय इनिंगला पुन्हा एकदा सुरुवात होणार असल्याचं बोलले जात आहे. सुर्यकांत दळवींच्या समर्थकांमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण पसरलं आहे.
हेही वाचा : माझ्यापर्यंत अजून काहीही माहिती नाहीये – आ. योगेश कदम
सत्य फार वेळ लपून राहत नाही, अशी प्रतिक्रिया सुर्यकांत दळवी यांनी ‘माय कोकण’शी बोलताना दिली आहे. माझ्या सक्रियतेने मुळे शिवसेना पक्षाला, कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना नक्कीच फायदा होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत सात डिसेंबरपर्यंत आहे. शनिवारी आणा रविवारी सुट्टी राहणार असल्याने या दिवसांमध्ये नगरपंचायतीकडून अर्ज स्वीकारले जाणार नाहीयेत.
सोमवारी आणि मंगळवारी या दोन दिवसांमध्ये उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी गर्दी होणार आहे.
येत्या दोन दिवसांमध्ये खूप वेगवान घडामोडी दापोली आणि मंडणगड नगरपंचायतीच्या बाबतीत घडण्याची शक्यता आहे.