मुंबई : मेस्मा हा कायदा अत्यावश्यक सेवेसाठी लावला जातो आणि एस.टी ही अत्यावश्यक सेवेत आहे. मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याबाबत आम्ही गंभीर आहोत. लवकरच आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून कारवाई करू असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपकारी एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांची मुंबई सेंट्रल येथील कार्यालयात महत्त्वाची बैठक झाली त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनिल परब बोलत होते.
अनिल परब म्हणाले, विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अजूनही माझं सांगणं आहे की, कोर्टाच्या निर्णयानंतर आम्ही निर्णय घेऊ. मात्र काहीजण ही पगारवाढ तात्पुरती असल्याची अफवा काहीजण सातत्याने पसरवत आहेत. परंतु यामध्ये तथ्य नाही. मी पगारवाढीचा चार्ट अगोदरच समोर आणलं होतं. 60 दिवस संप सुरू राहिला तर मुख्यमंत्री यांना राजीनामा द्यावा लागतो अशा अफवा पेरल्या जात आहेत मात्र यामध्ये काहीच तथ्य नाही.
