दापोली : दापोली मंडणगड नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ नेत्यांकडून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये आघाडी करण्याबाबत चर्चा होत आहे.

ही माहिती समोर येताच दापोली मंडणगडमध्ये खळबळ माजली आहे.

याबद्दल शिवसेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप सुर्वे यांच्याशी ‘माय कोकण’नं संपर्क साधला असता, याबद्दलची अधिकृत माहिती आमच्यापर्यंत नाही असं ते म्हणाले.

दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी दुसर्‍या दिवशीही उमेदवारी अर्ज न आल्यानं सलग दुसऱ्या दिवशी शून्य अर्ज अशी स्थिती दापोली नगरपंचायतीमध्ये आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता केवळ तीनच दिवस शिल्लक राहिले आहेत. 3, 6 आणि 7 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 4 आणि 5 डिसेंबर रोजी शनिवार आणि रविवार असल्याने नगरपंचायत कार्यालयास सुट्टी राहणार आहे. सुट्टीच्या दिवशी अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असं निवडणूक आयोगाने कार्यक्रम पत्रिकेमध्ये स्पष्ट केलं आहे.

आज रात्रीपर्यंत किंवा फार फार उद्यापर्यंत आघाडीबाबत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत इच्छुक उमेदवारांना वाट पाहण्याशिवाय काहीही करता येणार नाहीये.