गेल्या दोन दिवसांपासून पडलेली पावसाळी हवा, हवेतील गारठा आणि बुधवारी सकाळपासून सुरू असलेला संततधार पाऊस त्यात पडलेले दाट धुके या सगळ्याचा विपरित परिणाम आरोग्यावर होत असून, सर्दी, खोकला, ताप, फ्लू अशा साथरोगांना याचे निमंत्रण मिळाले आहे.
याशिवाय हवेतील या गारठ्यामुळे दम्याचा त्रास असलेल्यांना आणि हाडांचे रोग, संधीवात असलेल्या व्यक्तींना त्रास होण्याची शक्यता आहे. या पावसाळी हवेमुळे अंगदुखी, उत्साह नसल्यासारखे वाटणे, डोके दुखणे आदी आजारही उद्भवतात.
काही दिवसांपासून, हवेत उष्मा होता. त्यानंतर लगेचच हवामान बदल होऊन थंडीत वाढ झाली. त्यातून बुधवारी सकाळपासून पाऊस असल्याने आणि त्यातून धुके असल्याने दमेकरींना श्वसनाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे उष्ण वातावरणातून थंड वातावरणात संक्रमणात दम्याच्या रुग्णांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.