दापोली : महात्मा फुले स्मारक ट्रस्ट पुणेच्या वतीने देण्यात येणारा महात्मा फुले पुरस्कार यंदा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत कर्मवीर दादा इदाते यांना जाहीर झाला असल्याची माहिती ट्रस्टचे सचिव डॉ. गणेश परदेशी यांनी दिली आहे.
महात्मा फुले यांच्या विचाराने काम करण्यार्य व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. रोख रुपये २१ हजार, महात्मा फुले यांची प्रतिमा, पगडी, घोंगडे असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
दादा इदाते यांनी जीवनात प्रखर संघर्ष करुन वंचित, आदिवासी, भटके विमुक्त, कष्टकरी यांच्यासाठी केलेले काम गौरवास्पद असून आजही ते समाजाला आपल्या कामातून आणि विचारातून दिशा देण्याचे काम करत आहेत.
त्यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी एकमताने निवड केल्याची माहिती डॉ.परदेशी यांनी दिली. कर्मवीर दादा इदाते यांना यापूर्वीही अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून हा पुरस्कार जाहीर झाल्याने दादा इदाते यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.