दापोली – दापोली नगरपंचायतीच्या निडवणुकीचे वारे वाहू लागले आहेत. युती आणि आघाड्यांची सध्या जोरदार चर्चा आहे. १ डिसेंबर २०२१ पासून म्हणजे बुधवारपासून दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला सुरूवात होणार आहे. खेड प्रमाणे दापोलीमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेमध्ये युती होणार का याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे.
दापोली नगरपंचायतीमध्ये २०१६ साली शिवसेनेचे ७ नगरसेवक निडणून आले होते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ नगरसेवक विजयी झाले होते. काँग्रेसचेही ४ नगरसेवक निडणून आले होते व भाजपाचे २ नगरसेवक विजयी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षानं निवडणुक एकत्रपणे लढली होती. पण सत्ता स्थापन मात्र शिवसेना आणि काँग्रेसनं एकत्र येऊन केलं होतं.
गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे वेगवेगळे लढले होते पण यंदा ते एकत्र लढण्याची शक्यता आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस मनसेला किती जागा सोडते हेच ठरणं बाकी आहे. त्यावरच पुढील गणित अवलंबून राहणार आहे.