रत्नागिरी:- शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण (नसबंदी) कुचकामी ठरत आहे. पालिकेने यावर आतापर्यंत सुमारे ५० लाख रुपये खर्च केले आहेत. तरी भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. शासनाने याबाबत योग्य तो निर्णय घेऊन मार्गदर्शन करावे, अशा प्रकारची चर्चा रनपच्या सर्वसाधारण सभेत झाली.
नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. या वेळी विषय पत्रिकेवरील सात विषयांवर चर्चा करण्यात आली.
शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करणे आणि त्यासाठी जागा निश्चिती करण्याबाबतचा विषय सुरवातीलाच चर्चेला आला. मात्र याबाबत नगराध्यक्ष बंड्या साळवी व इतर सदस्यांनी या नसबंदीचा काहीच फायदा होत नसल्याचे सभागृहापुढे मांडले.
भटक्या कुत्र्यांना उचलून त्यांची नसबंदी करून पुन्हा त्याच ठिकाणी त्याला सोडले जाते. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. कुत्र्यांचा उपद्रव कायम आहे.
आतापर्यंत या निर्बिजीकरणावर पालिकेने ५० लाखाच्यावर पैसे खर्च केले आहेत. तरी त्याचा अपेक्षित परिणाम दिसत नाही. त्यामुळे आता निर्बिजीकरण मोहीम बंद करण्याबाबत सर्वांचे एकमत झाले. पुढील उपाययोजनेबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविण्याचा निर्णय घेण्यात आला.