तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर पूर्ण अंमल प्रस्थापित केल्यानंतर तिथली परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर आणि गुंतागुंतीची होऊ लागली आहे. एकीकडे अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या वर्चस्वाखाली कशा प्रकारचं सरकार आणि शासनव्यवस्था अस्तित्वात येणार, याविषयी अफगाणी नागरिकांसोबतच जगभरात चिंता व्यक्त होत असताना दुसरीकडे अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या जगभरातल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सर्वच राष्ट्रांचे प्रयत्न सुरू आहेत. या मदतकार्यामध्ये तालिबान्यांकडून अडथळा निर्माण केला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तालिबान्यांना गंभीर इशारा दिला आहे.

इतिहासातील सर्वात कठीण एअरलिफ्ट्सपैकी एक

व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जो बायडेन यांनी अफगाणिस्तानमधून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याच्या सुरू असलेल्या मदतकार्याविषयी चिंता व्यक्त केली. “हे इतिहासातल्या सर्वात मोठ्या आणि सर्वात कठीण अशा एअरलिफ्टपैकी एक आहे. याचा शेवट काय होईल, हे मी आत्ताच सांगू शकणार नाही”, असं जो बायडेन म्हणाले आहेत. १४ ऑगस्टपासून आत्तापर्यंत काबूल विमानतळावरून १३ हजार नागरिकांना एअरलिफ्ट करण्यात आलं असून अजूनही ही संख्या वाढत आहे. अफगाणिस्तानमध्ये नक्की किती अमेरिकी नागरिक राहात आहेत, हे २० वर्षांच्या युद्धानंतर देखील अमेरिकेला माहिती नव्हतं, असं देखील बायडेन यावेळी बोलताना म्हणाले.

“..तर खबरदार, सडेतोड उत्तर देऊ”

दरम्यान, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या पत्रकार परिषदेमध्ये बायडेन यांनी तालिबान्यांना कठोर इशारा दिला आहे. “आम्ही तालिबान्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की आमच्या फौजा किंवा काबूल विमानतळावर सुरू असलेलं बचावकार्य यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला केलात, तर त्याला तितक्यात तीव्रतेनं आणि सडेतोड उत्तर दिलं जाईल”, असं बायडेन म्हणाले.

“आम्ही काबूल विमानतळ पूर्णपणे सुरक्षित केलं आहे. तिथून येणाऱ्या विमानांसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. याचा तिथल्या लष्करी कारवाईसोबतच स्थानिक नागरिक आणि एनजीओंच्या विमानांना देखील उपयोग होणार आहे”, अशी माहिती बायडेन यांनी दिली. “सध्या काबूल विमानतळाभोवती आणि धावपट्टीवर संरक्षण पुरवण्यासाठी ६ हजार अमेरिकी सैनिक तैनात करण्यात आले आहेत”, असं देखील ते म्हणाले.

दहशतवादाविरुद्धचा लढा सुरूच!

दरम्यान, अफगाणिस्तानमधून अमेरिकी आणि नाटोच्या फौजा जरी माघारी आल्या असल्या, तरी अमेरिकेचा दहशतवादविरोधातील लढा कायम राहणार असल्याचं यावेळी बायडेन यांनी स्पष्ट केलं. यासाठी आमचे सहकारी आणि अफगाणिस्तानमध्ये शांतता राहावी यासाठी इच्छुक असणाऱ्या सर्वच देशांसोबत आम्ही मिळून काम करू, असं बायडेन यांनी सांगितलं.