दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता (कृषी) आणि शिक्षण संचालक डॉ. अरुण मांडोखोत ह्यांचे नुकतेच पुणे येथे त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते 77 वर्षांचे होते.

डॉ. मांडोखोत यांचे शालेय शिक्षण शेगाव जि. बुलडाणा येथे, तर उच्च शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठात झाले. जागतिक कीर्तीचे कवकशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. फवगी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी १९७४ साली विशेष प्राविण्यासह पीएच.डी. पदवी संपादन केली. त्यानंतर १९७५ साली ते कर्जतच्या भात संशोधन केंद्रात वनस्पनि रोगशास्त्रज्ञ म्हणून रुजू झाले. तेथील बारा वर्षाच्या सेवाकाळात त्यांनी भात पिकावरील रोगांच्या नियंत्रणासाठी मोलाचे काम केले. बुरशीजन्य करपा आणि कडा करपा रोगांना प्रतिकारक ‘कर्जत-१’ ही भाताची जात विकसित करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. कर्जतहून १९८७ साली दापोलीच्या कृषी महाविद्यालयात वनस्पती रोगशास्त्र विभागाचे प्राध्यापक
म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला. सन 2002 पर्यंत त्यांनी या विभागाचे प्रमुखपद सांभाळले. त्या कालावधीत रोग अनुमान केंद्र, अळंबी उत्पादन केंद्र, आयातपश्चात सेंगरोध अशा विविध योजना त्यांनी सुरु केल्या.

पदवीपूर्व व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना विविध विषय त्यांनी शिकवले. त्यांनी एकूण १२ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवीसाठी मार्गदर्शन केले. डॉ. मांडोखोत यांनी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता आणि विद्यापीगचे शिक्षण संचालक म्हणूनही मौलिक कार्य केले.

निवृत्तीनंतर रसायनी (जि. रायगड) येथील कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य आणि मुंबईच्या नामांकित वेलिंगकर संस्थेत तज्ञ मार्गदर्शक म्हणून मोलाचे योगदान दिले. उदयपूर येथील ‘भारतीय कवक आणि वनस्पती रोग शास्त्रज्ञ संस्थेने’ त्यांना २००० साली राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले होते.

– अशोक निर्बाण, दापोली