मुंबईच्या सीएसएमटी, भायखळा, दादर रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या अफवेमुळे खळबळ उडाली होती. एका निनावी कॉलच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस यंत्रणेची टीम बॉम्ब स्कॉड आणि डॉग स्कॉडसोबत स्टेशन परिसरात दाखल झाली आणि त्यांच्याकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. दोन तास हे सर्च ऑपरेशन सुरु होतं, सर्च ऑपरेशन दरम्यान पोलिसांना कोणतीही संशयित वस्तू याठिकाणी आढळून आली नाही. या निनावी फोननंतर भायखळा, दादर रेल्वे स्थानकावर देखील जीआरपी आणि मुंबई पोलिसांची टीम तैनात करण्यात आली होती. या स्थानकांवर येणाऱ्या प्रत्येकाची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत होती.शुक्रवारी रात्री ९ : ४५ दरम्यान रेल्वे विभागाला निनावी फोन आला होता. ज्याच्यानंतर मुंबई पोलिस, जीआरपी, डॉग स्कॉड आणि बॉम्ब स्कॉडकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. मुंबई पोलिसांकडून हॉक्स कॉल करणाऱ्या इसमाचा शोध सुरु आहे.