श्रीवर्धन (समीर रिसबूड)- श्रीवर्धन-हरिहरेश्वर मार्गावरील काळींजे गावालगत खाडी असून काळींजे खाडीला उधाण आल्यानंतर भरतीचे पाणी आराठी ग्रामपंचायत, आयर मोहल्ला, मोगल मोहल्ला, दिवाणबाग तसेच श्रीवर्धन शहराच्या भाजीबाजाराच्या मागील बाजूस असलेल्या शेती, वाडी परिसरात शिरत असल्यामुळे ह्या परिसरातील नागरिकांना ह्या खाडीला आलेल्या भरतीचा त्रास होत असून संबंधित विभागाला धोका निर्माण झाला आहे.
खाडीला येणाऱ्या उधाणाच्या पाण्याचे संरक्षण करण्यासाठी बंधारा अथवा संरक्षण भिंत नसल्यामुळे भविष्यात समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली तर संबंधित विभागाचे जनजीवन विस्कळीत होऊ शकते किंबहुना मनुष्यहानी ही होऊ शकते. ह्या बाबतीत शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक वसंतशेठ यादव यांनी दखल घेतली असून त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले, “मी स्वतः खाडीचे उधाण येणार्या विभागाची प्रत्यक्ष पाहणी केली आहे.भरतीच्या पाण्यामुळे तेथील रहिवाशांच्या घरांना धोका निर्माण झाला आहे.खाडीच्या पाण्यामुळे शेती व वाडी यांचेही नुकसान होत आहे.भरतीच्या पाण्याबरोबर कचरा,घाण वाहत येते तसेच ओहोटी लागल्यानंतर कचरा व घाण तेथेच राहिल्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरते.सदर विभागांतर्गंत अधिकार्यांनी तेथील प्रत्यक्ष पाहणी करावी.मी खासदार व पालकमंत्री ह्यांनाही ह्या बाबतीत लेखी निवेदन दिले आहे.