पूर्ण चाचण्या व तज्ञांकडून मान्यतेनंतर होणार शिक्कामोर्तब

नवी दिल्ली– भारतातील १८ वर्षांखालील मुलांचे लसीकरणही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाला आज दिली आहे. सध्या देशात १८ वर्षांखालील मुलांवर लसीच्या चाचण्या करण्यात येत आहेत आणि त्या आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. चाचण्या पूर्ण झाल्या आणि तज्ज्ञांनी लसीकरणाची मान्यता दिली की लगेचच १८ वर्षांखालील मुलांच्या लसीकरणासाठीचं नियोजन करण्यात येणार आहे. १२ ते १८ वयोगटातल्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना प्राधान्याने करोना प्रतिबंधक लस द्यावी, अशी याचिका एका १२ वर्षीय बालकाने आपल्या आईच्या माध्यमातून आणि एका ८ वर्षांच्या मुलाच्या आईने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेला उत्तर देताना केंद्र सरकारने ही माहिती दिली आहे. सरन्यायाधीश डी.एन पटेल आणि न्यायमूर्ती ज्योती सिंग यांच्या विभागीय खंडपीठासमोर सुनावणी झाली.