महाराष्ट्र, दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये लसींअभावी केंद्रे बंद ठेवावी लागत असली तरी, नवनियुक्त केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी मात्र लशींचा तुटवडा नसल्याचा दावा केला आहे. राज्यांना लसमात्रांच्या पुरवठ्याची पूर्वसूचना दिली जाते. तरीही, लसीकरण केंद्रांवर लांबलचक रांगा लागत असतील तर गैरव्यवस्थापन कोणामुळे होते आणि समस्यांचे केंद्र नेमके कुठे आहे, हे स्पष्ट होते, असे ट्वीट करत मंडाविया यांनी राज्यांवर खापर फोडले. गेल्या महिन्यात तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनीही, समस्या केंद्राच्या लसपुरवठ्यात नसून राज्यांच्या व्यवस्थापनात असल्याचा दावा केला होता. त्याच पद्धतीने नव्या आरोग्यमंत्र्यांनी ही लसीकरणातील समस्यांना राज्यांना जबाबदार धरले आहे. मंडाविया यांनी बुधवारी सहा ट्वीट करून लसपुरवठ्याबाबत केंद्र सरकारच्यावतीने स्पष्टीकरण दिले आहे. विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यांतील मंत्री, नेत्यांकडून लशींचा तुटवडा असल्याची भीती लोकांमध्ये निर्माण केली जात आहे. जून महिन्यात राज्य सरकारे व खासगी रुग्णालयांना एकूण ११.४६ कोटी लसमात्रांचा पुरवठा केला गेला, त्यामध्ये जुलै महिन्यात वाढ करून १३.५० कोटी लसमात्रा उपलब्ध करून दिल्याची माहिती मंडाविया यांनी दिली.