नवी दिल्ली : कोरोनाच्या काळात सत्कार आणि सोहळे यांना फाटे द्या. जनतेत जा. त्यांचे प्रश्न समजून घ्या. सोशल मीडिया वा एकूणच माध्यमे यांना मुलाखती टाळा. मात्र घेतलेल्या निर्णयांची नीट माहिती द्या, असा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या मंत्र्यांना दिला. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी गुरुवारी पंतप्रधान मोदी यांनी सायंकाळी आधी कॅबिनेट मंत्री व नंतर राज्यमंत्री यांची बैठक घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, नव्या मंत्र्यांनी आठवड्याचे पाच दिवस दिल्लीत थांबून आपापल्या मंत्रालयाचा, कामाचा अभ्यास करावा. अधिकाऱ्यांकडून माहिती घ्यावी, पण त्यांच्या सल्ल्यांवर अवलंबून राहू नका, अशा सूचना भाजपने सर्व मंत्र्यांना दिल्याचे सांगण्यात आले. कोरोनावर नियंत्रण, उद्योग व अर्थचक्र पुन्हा रुळावर आणणे, शेती व शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यावर भर आणि त्यांच्या मनातील गैरसमज दूर करणे यावर भर देणे आवश्यक आहे, असेही मंत्र्यांना सांगण्यात आल्याचे समजते.