नवी दिल्ली – देशात 5 जी मोबाईल नेटवर्क उभारण्यास एका याचिकेद्वारे विरोध करणारी अभिनेत्री जुही चावला आणि अन्य दोन जणांना दिल्ली हायकोर्टाने 20 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ही रक्‍कम भरण्यासाठी हायकोर्टाने जुही चावला आणि अन्य दोन जणांना एक आठवड्याची मुदत दिली आहे. ही रक्कम अद्याप न भरल्याबद्दल हायकोर्टाने नाराजीही व्यक्‍त केली आहे. त्यांची ही याचिका फाजील स्वरूपाची आहे असा आक्षेप घेत कोर्टाने त्यांच्यावर ही दंडात्मक कारवाई केली होती.

याचिकाकर्त्यांविषयी आम्ही अजूनही मवाळ भूमिका घेत आहोत. त्यांनी 20 लाखांची रक्‍कम भरल्यानंतर त्यांच्या विरोधातील न्यायालयाची बेअदबी केल्याचा खटला मागे घेण्यात येईल, असेही कोर्टाने आज स्पष्ट केले. जुही चावला व अन्य संबंधितांनी देशातील न्याय प्रक्रियेचा गैरफायदा घेत केवळ प्रसिद्धीसाठी अशा प्रकारची याचिका केली आहे. 5 जी फोन नेटवर्कमुळे आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होतील, असा त्यांनी घेतलेला आक्षेप निरर्थक आहे. ही केवळ खोडसाळ मनोवृत्तीतून करण्यात आलेली याचिका आहे असे निरीक्षणही कोर्टाने त्यांच्या बाबतीत आधी नोंदवले आहे. 5 जी नेटवर्कमुळे पृथ्वीवरील मानवासहित सर्वच प्राणिमात्रांना हानी पोहोचेल असे जुही चावला व तिच्या सहकाऱ्यांचे म्हणणे होते. त्यामुळे तिने ही याचिका केली होती.