खेड : मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे जिल्ह्यात कलम १४४ प्रमाणे जमावबंदी लागू आहे. या परिस्थितीतदेखील शेकडो पर्यटकांनी रविवारी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील रघुवीर घाटात पावसातील मनमोहक निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी गर्दी केली होती. याला प्रतिबंध करण्यासाठी पुढील एक महिन्यासाठी रघुवीर घाट बंद करण्याचे आदेश प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने यांनी दिले आहेत. कोविडचा वाढता प्रादुर्भाव आणि संचारबंदी याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला. रघुवीर घाटातील हॉटेल ग्रामपंचायतीने सील करून तसा अहवाल सादर करण्याचे आदेश दिला आहे.