रत्नागिरी : मुंबई येथील नामवंत अशा टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टीस/TISS) या विद्यापिठाने वाय.डी. यादव यांना डॉक्टरेट (पीएच.डी.) प्रदान केली आहे. नुकत्याच मुंबई येथे झालेल्या पदवीदान समारंभामध्ये (Convocation) त्यांना डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. कोविड-१९ उद्रेकामुळे यंदा हा पदवीदान समारंभ ऑनलाईन (र्व्हच्युअल) घेण्यात आला होता.
‘माहिती तंत्रज्ञान (Information Technology-IT) आणि फळशेती (Pomology): पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याचा अभ्यास’ या विषयावरील प्रबंध (Thesis) यादव यांनी टीस (TISS) विद्यापिठाच्या ग्रामीण विकास विभागाला सादर केला होता. यासाठी त्यांना टीस विद्यापिठातील प्राध्यापक डॉ. पी. गोपीनाथ यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी यादव म्हणाले, “माझी चांगल्या विद्यापिठातून डॉक्टरेट करण्याची तीव्र इच्छा होती. यानंतर मला मुंबईच्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत (टीस) प्रवेश मिळाला. माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात शेतीविषयक माहिती, संशोधन, नवीन तंत्रज्ञान व नाविण्यपुर्ण प्रयोग शेतक-यांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती तंत्रज्ञान हे प्रभावी माध्यम ठरु शकते. हे मी ओळखून माझ्या संशोधनासाठी माहिती तंत्रज्ञान आणि फळशेती हा विषय निवडला. संशोधनातील पाच वर्षांच्या धडपडीनंतर मला टीस या जागतिक दर्जाच्या विद्यापिठाची डॉक्टरेट मिळाली. माझ्या या यशामध्ये माझे कुटुंब, नातेवाईक, मित्रमंडळी, गुरु आणि गादेगांवकर यांचा मोलाचा वाटा आहे”.
डॉक्टरेटसाठी यादव यांनी केलेले संशोधन सखोल असून, ते माहिती तंत्रज्ञानावर आधारीत ग्रामीण आणि कृषि विकासासाठी महत्वाचे आहे. वाय. डी. यादव हे मुळचे गादेगांव (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील असून त्यांना कृषि माहिती क्षेत्रातील प्रदिर्घ अनुभव आहे. ते गादेगांवचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक द. शा. यादव (गुरुजी) यांचे चिरंजीव आहेत.
जिद्द आणि धडपडीतून मिळवली ‘टीस’ची पीएच.डी.
विविध अडचणीवर मात करीत मागील पाच वर्षांपासून चिकाटीने सुरु असणा-या त्यांच्या प्रयत्नांचे हे फलीत आहे. त्यांच्या या जिद्द व परिश्रमाचे ग्रामीण भागामध्ये विशेष कौतुक होत आहे. म्हणून यादव यांची डॉक्टरेट शेतकरी कुटूबांतील आणि ग्रामीण युवकांना अति उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा देणारी आहे.