मुंबई : मुंबई आणि लगतच्या उपनगरांमध्ये दक्षिण-पश्चिम मान्सून दाखल झाला आहे. मान्सूनच्या पहिल्याच दिवशी पावसानं मुबईला चांगलंच झोडपलं. पावसाच्या कोसळधारांमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं, तसेच अनेक ठिकाणी वाहतूकही विस्कळीत झाली होती. अशातच हवामान विभागानं मुंबई आणि लगतची उपनगरं ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाचाही अंदाज वर्तवला आहे. यामुळे मुंबई, कोकणात अनेक ठिकाणी एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहेत.