मुंबई : राज्याच्या सागरी किनारी जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांना गेल्या वर्षीच्या निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाणार आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सात जिल्ह्यांव्यतिरिक्त तौक्तेचा फटका बसलेल्या इतर जिल्ह्यांनाही ही मदत दिली जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधी व राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीच्या निकषांच्या बाहेर जाऊन निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मदत देण्यात आली होती. तोच निकष या ठिकाणीही असेल. मदतीपासून कुणीही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. याचदरम्यान, राज्याचे मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तौक्ते नुकसानग्रस्तांना २५० कोटी देण्याचा प्रस्ताव मांडल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या प्रस्तावावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.