करोनामुळे राज्यात १ जूनपर्यंत लॉकडाउन लावण्यात आलेला असून कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत.
राज्य सरकारने प्रवासावरही निर्बंध घातले असून ई-पासची अट घालण्यात आली आहे.
ई-पास नसणाऱ्यांना पोलीस प्रवासाची परवानगी देत नसून कारवाई देखील केली जात आहे.
दरम्यान भारतीय संघाचा क्रिकेटर पृथ्वी शॉ गोव्याला जात असताना त्यालाही पोलिसांनी अडवलं.
पोलिसांनी चौकशी केली असता ई-पासविनाच प्रवास करत असल्याचं समोर आलं.
पृथ्वी शॉ कारने आपल्या मित्रांसोबत मुंबईहून कोल्हापूरमार्गे गोव्याला चालला होता.
यावेळी आंबोली पोलिसांनी त्याला रोखलं आणि ई-पासची विचारणा केली.
ई-पास नसल्याने पृथ्वी शॉने आपल्याला जाण्याची परवानगी द्यावी यासाठी विनंती केली.
मात्र पोलिसांनी ई-पासशिवाय पुढील प्रवास करता येणार नाही असं स्पष्ट केलं.
यानंतर पृथ्वी शॉने आपल्या मोबाइलवरुन ई-पाससाठी अर्ज केला.
एका तासात पृथ्वी शॉला ई-पास मिळाला आणि त्यानंतरच त्याला पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली.
पृथ्वी शॉ आय.पी.एल.मध्ये दिल्ली संघातून खेळत होता.
करोना संकटामुळे आय.पी.एल. स्पर्धा स्थगित करावी लागली आहे.
स्पर्धा स्थगित झाल्यामुळे अनेक क्रिकेटर्स सध्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत असताना पृथ्वी शॉने मित्रांसोबत गोव्याला जाणं पसंत केलं.
मात्र यावेळी नियमांचं पालन न करणं त्याला चांगलं महागात पडलं.
पास नसल्याने एक तासाहून अधिक वेळ त्याला कारमध्येच थांबावं लागलं होतं.
यादरम्यान, कर्तव्य बजावणाऱ्या सिंधुदूर्ग पोलिसांचं कौतुक होत आहे.