अमेरिकेत परवानगी मिळालेल्या जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनच्या लसीचे उत्पादन भारतात घेण्याचे प्रयत्न अमेरिकेने सुरू केले आहे. अमेरिकेचे गृहमंत्री डॅनियल स्मिथ यांनी याबाबत माहिती दिली. भारतातील लस उत्पादक आणि अमेरिकी कंपन्यांमार्फत संयुक्तपणे या लसीचे उत्पादन घेणे शक्य आहे का, याची चाचपणी सध्या सुरू करण्यात आली आहे. भारतात सध्या मोठ्या प्रमाणावर बाधितांची संख्या वाढत असून, तिसरी लाट अटळ असल्याचे मानले जात आहे. या पृष्ठभूमीवर लसींचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अधिकाधिक प्रकारच्या लसी उपलब्ध होण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

अमेरिकेतील डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन भारतातील लस उत्पादनात गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे, अशी माहिती स्मिथ यांनी दिली. जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन लसीच्या उत्पादनासाठी या कॉर्पोरेशनच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात भारतातील खासगी क्षेत्रामधील कंपन्यांशी वाटाघाटी सुरू आहेत. यामुळे लसीचे उत्पादन अधिकाधिक वेगाने करणे शक्य होईल. यातून पुढील वर्षी म्हणजेच 2022 च्या अखेरपर्यंत भारतात 100 कोटी लसींच्या मात्रांचे उत्पादन होऊ शकेल. लसींच्या उत्पादनासाठी भारताला कच्चा माल पुरवणे अवघड असल्याचे यावेळी स्मिथ म्हणाले. भारत सरकारने कच्च्या मालाची यादी दिली आहे. अमेरिका या मालाचा आणि इतर साधनांचा पुरवठा तातडीने करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, जागतिक स्तरावरच कच्च्या मालाची पुरवठा साखळी विस्कळीत होऊ लागल्यामुळे हे सोपे नाही. आम्ही सध्या भारतासोबत या यादीवर काम करीत आहोत. आमच्याकडे काय उपलब्ध आहे, काय आम्ही पुरवू शकतो आणि किती वेगाने त्याचा पुरवठा करता येऊ शकेल यावर आम्ही काम करीत आहोत. कच्च्या मालाच्या पुरवठ्याची समस्या जगातील सर्वच लसींच्या बाबतीत आहे, असे त्यांनी सांगितले.