पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी पदवी प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत आहेत. शैक्षणिक वर्ष 2019-20च्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उशिराने झालेल्या परीक्षांचा निकाल जाहीर होऊनही अद्याप विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रच मिळालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण तसेच नोकरीसाठी अडचणी येत आहेत.याविषयी अनेक विद्यार्थ्यांनी मदतीसाठी युवासेनेकडे धाव घेतली. याची गंभीर दखल शिवसेना नेते, युवासेना प्रमुख राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली. आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेनेच्या शिष्टमंडळाने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली . उदय सामंत यांनी याप्रकरणी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. करमरकर यांच्याशी संपर्क करून ‘पदवीदान’ समारंभ आयोजित करून विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात यावे असे आदेश दिले.