रत्नागिरी कोरोना महामारीमध्ये गावपातळीवर कोरोना योद्ध्यांची महत्त्वपूर्ण जबाबदारी ग्रामसेवक चांगल्या रितीने पार पाडत आहेत. जिल्ह्यातील 846 ग्रामपंचायतीत 627 ग्रामसेवक असून कोरोनापासून गाव सुरक्षित ठेवण्यापासून ते अगदी ग्रामस्थांना लागणार्‍या सोयीसुविधांसाठी कार्यरत आहेत.

गावे, बाजारपेठ परिसरात सॅनिटायझर, घरोघरी धान्य वाटप, परजिल्ह्यातून येणार्‍या मजूरांना राहण्याची व्यवस्था अशा प्रकारची कामेही ग्रामसेवक करत आहेत. ग्रामसेवकांसह ग्रामकृतीदलांनी पहिल्या लाटेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याप्रमाणे सध्या माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी मोहीम यशस्वी करण्यासाठी ते प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यांच्या प्रयत्नामधूनच ही लाट थोपवणे सोपे होणार आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी ग्रामसेवकींचे कौतुक केले.