दापोली : परमप्रिय मुराद, माझ्या जिवंतपणी तुझ्यासाठी मरहूम, पैगंबरवासी, स्वर्गीय अशी संबोधने मला वापरावी लागतील असा विचार माझ्याच काय कोणाच्याही स्वप्नात देखील आला नाही.
पण… आज तसं करावं लागतंय यापेक्षा दुर्देव ते काय! अरे, जेमतेम महिन्याभरापूर्वी तू मला फोन करून सांगितलंस की तुला माझ्याशी बोलायचंय. तू माझ्या घरी येणार होतास. पण तसं न करता तू सरळ देवाघरी गेलास. का? का? का?
तू मला काय सांगणार होतास, हे मला माहीत नाही आणि आता कधीच कळणार नाही. पण मी तुला सांगणार होतो की तू आम्हा सर्वांचा लाडका आहेस. तुझी विनम्रता, शालीनता, विद्वत्ता आणि दातृत्व या गुणांमुळे तू सर्वांना हवाहवासा वाटायचास.
तुला मी हे सांगणार होतो की कोकणातलेच नव्हे तर जगातले विद्यार्थी, शास्त्रज्ञ आणि शेतकरी तुझे कृतज्ञ आहेत. मी तुला ही विनंती करणार होतो की तू तुझ्या अनुभवांच्या आधारे ह्या तिघांसाठी छान पुस्तके लिही.
सेवेत असताना नाही म्हटलं तरी मनासारखं काम सदैव करता येत नाही. मी तुला सांगणार होतो की, आता आधी तू कुटुंबियांसोबत मनमुराद मजा कर. तू आयुष्यात सर्वकाही स्वकष्टानं मिळवलंस. स्वतःचा विचार न करता इतरांना आनंद देत राहिलास, इतरांचं जीवन फुलवत राहिलास. म्हणूनच तुला सर्व जण मानतात, प्रेम करतात.
तू जगप्रसिद्ध वनस्पती शरीरक्रिया शास्त्रज्ञ! पण जगण्याच्या धावपळीत स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष केलंस. बघतोयस ना हे दुर्लक्ष किती महाग पडलं. तुझं ठीक आहे रे, तू अल्लाच्या दरबारात रुजू झालास. तुझ्यासारखा नेक बंदा आल्यावर जन्नत सुध्दा स्वतःला भाग्यवान समजत असेल. दरबाराची रौनक वाढल्यामुळे खुदा देखील खूश झाला असेल. पण तू आमची दुनिया भकास करून गेलास, त्याचं काय?
ए नामुराद मुराद, तुला काहीच कसं वाटलं नाही रे असं अचानक आम्हाला सोडून जाताना? आमच्या आणि आंबा बागायतदारांच्या डोळ्यातले अश्रू तुला दिसताहेत ना? तू उभारलेल्या आणि फुललेल्या आंबा बागा तुझ्या वियोगाने कशा सुकत चालल्यात बघ!
ए मुराद, तू आज्ञाधारक विद्यार्थी आहेस ना! मग या वेड्या गुरुजीची आज्ञा, नव्हे विनंती, ऐक आणि परत ये!
– प्रा. अशोक निर्बाण, दापोली