नवी दिल्लीः देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज लसीकरण आणि करोना रुग्णांबाबत माहिती दिली. देशात आतापर्यंत १२,७१,००,००० अधिक जणांना करोनावरील लस दिली गेली आहे. मृत्यू दरही १.१८ टक्के इतका कमी झाला आहे. दोन दिवसांपूर्वी देशात आयसीयू बेडवर १.९३ टक्के रुग्ण होते. आता ही संख्या कमी होऊन १.७५ टक्के इतकी झाली आहे. दोन दिवसांपूर्वी व्हेंटिलेटवर ०.४० टक्के रुग्ण होते. आज ही संख्या तेवढीच आहे. दोन दिवसांपूर्वी देशात ऑक्सिजन सपोर्टवर ४.२९ टक्के रुग्ण होते. ते आज ४.०३ टक्के इतके आहेत, अशी माहिती हर्षवर्धन यांनी दिली. गेल्या वर्षी होम आयसोलेशनमध्ये ८० टक्के रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. यावर्षी करोना रुग्णांच्या उपाचारात आपली सुरवात चांगली आहे. पण आपल्याला आरोग्य सुविधा आणखी वाढवण्याची गरज आहे. आपण सध्या हॉस्पिटल्समध्ये तात्पुरते बेड बनवत आहोत. तसंच हॉस्पिटल्समध्ये मनुष्यबळ वाढवण्यावरही आपण काम करत असल्याचं हर्षवर्धन यांनी सांगितलं. एम्समध्ये अनेक असे डॉक्टर्स आहेत जे दुसऱ्या विभागांमध्ये काम करत आहेत. अनेक नर्सेस आहेत ज्यांनी गेल्या वर्षी करोनात थेट काम केले नाही. पण आता आपण मनुष्यबळ वाढवण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देऊन करोनाच्या उपचारासाठी सक्षम बनवत आहोत, असं हर्षवर्धन म्हणाले. देशात गेल्या २४ तासांत करोनाचे २ लाख ५९ हजाल १७० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यादरम्यान १७६१ रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला आहे.