दापोली : अँटीजेन टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे कळताच प्राथमिक आरोग्य केंद्रातून तीन जणांनी पळ काढल्याची घटना आज पिसई येथे घडली. अखेर त्यांना ताब्यात घेण्यासाठी दापोली नगरपंचायतीचे कर्मचारी त्यांच्या काळकाईकोंड येथे पोहोचले. आता त्यांना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कोव्हिड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी तपासणी करून तसे प्रमाणपत्र मिळवणे या तिघांना गरजेचे होते. टेस्ट मध्ये आपण कोरोना पॉझिटिव्ह आहोत कळल्यावर नवरा-बायको व त्यांच्या मुलाने कोणत्याही वैद्यकीय अधिकाऱ्याला व तेथील उपस्थित कर्मचाऱ्यांना न सांगता त्यांचा डोळा चुकवून तेथून मोटरसायकलने पळ काढला होता.
आरोग्य विभागाच्या वतीने तात्काळ दापोली पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. दापोली पोलिसांनी व आरोग्य विभागाने तात्काळ हालचाल करून या तिघांचाही शोध लावला. हे तिघे दापोली शहरातील काळकाई कोंड परिसरात सापडून आले. त्यांना ताब्यात घेऊन तात्काळ डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कोव्हीड कक्षात ठेवण्यात आले आहे अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
दापोलीमध्ये काही काळ या घटनेमुळे खळबळ माजली होती. पण आता परिस्थिती पूर्णपणे नियौत्रणात आहे.