रत्नागिरी : १५ दिवसांसाठी कडक कर्फ्यू लागू होताच बिनकामाचे फिरणाऱ्या हौशा-नवश्यांना प्रशासनाने चांगलाच दणका दिला आहे. रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथे दिवसभरात 142 जणांची प्रशासनाने कोरोना तपासणी केली आहे. त्यापैकी 5 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

यावरून रत्नागिरीत धक्कादायक स्थिती असल्याचं समोर आलं आहे. कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण नाहक घराबाहेर फिरून कोरोना पसरवत आहेत असंच स्पष्ट होत आहे. अशा लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी मागणी होत आहे.

कोरोनाची चेन ब्रेक करण्याकरिता शासनाने १५ दिवसांचा कर्फ्यू जाहीर केला आहे. अत्यावश्यक असेल तर लोकांनी घराबाहेर पडावं असं वारंवार अवाहनही करूनही बिनकामाचे लोक बाहेर हिंडताना दिसत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिसांनी केलेल्या आवाहनाला लोकं प्रतिसाद देताना दिसत नाहीयेत.

कामाशिवाय बाहेर फिरणाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा प्रशासनाने दिला होता. तरी देखील लोकं जुमानत नाहीयेत. अशा लोकांवर उद्यापासून अधिक कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.