दापोली : कोरोना रूग्णांची संख्या दापोली तालुक्यामध्ये कमालीची वाढत आहे. गेल्या १३ दिवसांमध्ये २०१ रूग्ण एकट्या दापोली तालुक्यात पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस विक्राळ स्वरूप घेत आहे. दापोलीमध्ये गेल्या ३० तासांमध्ये ६ रूग्ण दगावले आहेत. त्यामुळे चिंताजन परिस्थिती भितीमध्ये रूपांतरीत होऊ पाहते आहे.

कोरोनावर मात करायचं असेल तर नागरिकांनी गांभीर्य दाखवणं आवश्यक आहे. खबरदारीच्या उपाय योजनांचं काटेकोरपणे पालन करणं नितांत गरजेचं आहे. दुर्दैवानं या गोष्टी होत नसल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १ मे २०२१ पर्यंत राज्यावर कडक निर्बंध लावले आहेत.

दापोली उपजिल्हा रूग्णालयात ऑक्सिजनचे ३० बेड आहेत आणि सर्वच्या सर्व आता फुल आहेत. दापोलीमध्ये रूग्णांना ऑक्सिजन बेडसाठी भांडावं लागत आहे. पण डॉक्टर्सही हतबल आहेत कारण सध्या तरी ३० पेक्षा जास्त रूग्णांना ते दाखल करून घेऊ शकत नाहीयेत.

दापोली तालुक्यातील ग्रामीण भागातही रूग्ण संख्या वाढत आहे. ती आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे. किसान भवन येथील सीसीसी सेंटर सुद्धा कार्यान्वीत करण्याचे आले आहे. तिथेही पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ४०च्या वर पोहोचली आहे. त्यांना तीव्र लक्ष्णं नाहीयेत त्यांना डॉक्टर्स होम आयसोलेशनचा सल्ला देत आहेत. होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रूग्णांची संख्याही मोठी आहे.

खेडचे रूग्णही दापोली उपजिल्हा रूग्णालयात उपचार घेत आहेत

दापोली आणि मंडणगडचे रूग्ण आतापर्यंत दापोली येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार घेत होते. अतिशय मर्यादित साधन सामुग्रीत इथले डॉक्टर्स परिस्थिती हाताळत आहेत. त्यात खेडचेही रूग्ण दापोलीमध्ये दाखल होऊ लागल्यानं इथल्या रूग्णांनी जायचं कुठे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. खेडमधील कळंबणी येथील रूग्णालयात ५० बेड्सची व्यवस्था आहे. त्यामुळे खेडचे रूग्ण खेडमध्ये उपचार घेतील याची काळजी प्रशासनानं घेणं आवश्यक आहे.

मृत्यूचा आकडा वाढत आहे

कोरोनाची लक्ष्णं दिसल्यावर तातडीनं तपासणी करून घेणं फायद्याचं ठरत आहे. चाचणी करण्यामध्ये उशीर केल्यानं रूग्णांची प्रकृती ढासळण्याचा धोका आहे. दापोली तालुक्यात गेल्या १३ दिवसांमध्ये ९ पेक्षा जास्त रूग्णांचं मृत्यू झालं आहे. यापैकी ६ तर गेल्या ३० तासांच्या आत दगावले आहेत. त्यामुळए वेळेवर उपचार हे सुत्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे.

13 दिवसात २०१ हा आकडा तसा मोठा आहे

१ एप्रिल २०२१ पासून कोरोनाचे रूग्ण झपाट्यानं वाढत आहेत. सुरूवातील १ ते २ रूग्ण सापडत होते पण आता ही संख्या ४० पर्यंत पोहोचली आहे. गेल्या १३ दिवसांमध्ये २०१ रूग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. २०१ रूग्ण संख्या ही तशी मोठी आहे. ब्रेक द चेनच्या माध्यमातून तरी ही साखळी तुटेल अशी अपेक्षा करूया. या बाबतीत मात्र पॉझिटिव्ह राहुुया.