अन्न व औषध प्रशासन विभागाच्या रत्नागिरी कार्यालयात नव्याने स्थापन केलेल्या सेतू सुविधा केंद्राचे उदघाटन जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. अन्न व्यावसायिक औषध विक्रेत्यांना परवान्यासाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरीही ऑनलाईन अर्ज करताना व्यावसायिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. समस्यांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी सेतू सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले असून माफक सेवा शुल्क आकारून अत्यावश्यक परवाने व्यावसायिकांना देण्यात येणार आहेत. परवाना अर्जासाठी २०० रु., औषध विक्री परवाना, विक्री, नुतनीकरणासाठीच्या नोंदणी अर्जाकरिता १०० रुपये, उत्पादकांसाठी परवाना, नोंदणी अर्जाकरिता ४०० रुपये, औषध विक्रीच्या नवीन परवान्यासाठी ४०० रुपये औषध, विक्री परवाना घटनाबदल/जागाबदल नुतनीकरण अर्जाचे शुल्क ३०० रुपये ठरविण्यात आले आहे.
व्यापार्‍यांच्या सोयीसाठी संघटना पदाधिकार्‍यांशी समन्वय साधून तालुका स्तरावर परवाना कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व अन्न, औषध विक्रेते व्यावसायिकांनी सेतू सुविधा केंद्राचा लाभ घेवून सहकार्य करावे असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.