महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांतही करोनाचं थैमान सुरूच आहे. करोना विषाणूच्या संसर्गाचा वेग प्रचंड वाढला असून, फेब्रुवारीपासून होत असलेल्या रुग्णवाढीने शुक्रवारी नवा उच्चांक नोंदवला आहे. मागील २४ तासांतील आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली असून, खडबडून जागं करणारेच आकडे समोर आले आहेत. देशात २४ तासांत पहिल्यांदाच तब्बल दीड लाखांच्याजवळपास रुग्ण आढळून आले असून, ८०० रुग्णांना जीव गमावावा लागला आहे.

दापोलीत शुकशुकाट, 100% लॉकडाऊन (external Link)

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेनं जेरीस आणलं असून, प्रचंड वेगानं संक्रमण होत आहे. गर्दी आणि करोना नियमाबद्दलची उदासिनता यामुळे दिवसेंदिवस रुग्णासंख्या नवा उच्चांक गाठताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या गेल्या २४ तासांतील आकडेवारीतून हे स्पष्ट होत आहे. देशभरात गेल्या २४ तासांत तब्बल एक लाख ४५ हजार ३८४ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत ७७ हजार ५६७ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंता वाढवणारी गोष्ट म्हणजे देशातील मृतांच्या आकड्यात मोठी वाढ झाली आहे. २४ तासांत ७९४ म्हणजेच जवळपास ८०० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या १ कोटी ३२ लाख ५ हजार ९२६ इतकी झाली आहे.