मद्यधुंद ट्रक चालकाने आठ जणांना उडवल्याची घटना रेवदंडा रोहा मार्गावर घडली आहे. यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. याशिवाय एक जण अत्यवस्थ असून तीन जण जखमी झाले आहेत. बुधवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली आहे. दरम्यान, आसपासच्या ग्रामस्थांनी ट्रकचालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
…अखेर चांडगावनजीक हा ट्रक थांबला
रेवदंडा येथून हा ट्रक रोह्याच्या दिशेने वेगाने निघाला होता. साळाव आणि आमली येथे त्याने प्रत्येकी एका व्यक्तीला धडक देऊन जखमी केले. चेहेर येथे आणखीन दोघांना उडवले. या घटनेची माहिती मिळताच पुढील गावातील गावकऱ्यांनी ट्रक अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र अडथळे उडवून ट्रक निघून गेला. न्हावे येथे या भरधाव ट्रकने एका मोटरसायकलला धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली. या अपघातानंतरही चालकाने ट्रक थांबवला नाही. सारसोली येथे एका व्यक्तीला धडक देऊन त्याने आणखीन एका व्यक्तीला चिरडले. भरधाव वेगाने ट्रक चालवणाऱ्या या चालकाला चांडगाव नजीक स्थानिक युवकांनी धाडसाने पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी जमावाला शांत करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली.