रत्नागिरी-हापूस आंबा पेट्यांची वाहतूक करण्यासाठी एसटी विभागातर्फे रत्नागिरी जिल्ह्यासाठी 30 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 20 मालवाहू ट्रक पुरविण्यात येणार आहेत.त्यामुळे 5 एप्रिलपासून लालपरीतून आंबा वाहतूक सुरू होणार आहे.

31 मे पर्यंत ही वाहतूक करण्यात येणार आहे. कोरोनाच्या संसर्गामध्ये गतवर्षी आंबा व्यापार्‍यांसह थेट लोकांपर्यंत पोहचविण्यामध्ये अडचणी आल्या होत्या.

आंबा बागायतदारांसह व्यापार्‍यांची ही व्यथा लक्षात घेऊन यावर्षी सर्वसामान्यांची लालपरी (एसटी)आंबा वाहतुकीसाठी सज्ज झाली आहे.विविध भागामध्ये हापूस आंबा एसटी गाड्यांद्वारे लोकांपर्यंत पोहचविण्याचा निर्णय एसटी विभागाने घेतला आहे.

त्यासाठी एसटी गाड्याही सज्ज झाल्या आहेत. रत्नागिरी,सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकण भागातून मुंबई ठाणे,पुणे, सातारा,सांगली,कोल्हापूर व इतर जिल्ह्यामध्ये एसटी गाड्यांद्वारे आंबा वाहतूक करण्यात येणार आहे.

मुंबईतील मुंबई सेंट्रल किंवा परळ, कुर्ला नेहरू नगर, पनवेल, ठाण्यामध्ये ठाणे-1 किंवा ठाणे-2, भिवंडी, बोरिवली-सुकुरवाडी किंवा कल्याण, पुणे पिंपरी-चिंचवड यासह सांगली, सातारा,कोल्हापूरला आंबा पाठवता येईल.

आंबापेट्यांच्या वाहतुकीसाठी 300 किमीपासून ते 1500 किमीपर्यंत 5 डझन आंब्याच्या पुठ्ठ्याच्या पेटीसाठी 40 रुपयापासून 190 रुपयांपर्यंत दर निश्‍चित करण्यात आले आहेत.

तर,लाकडी पेटीसाठी 50 रुपयापासून 250 रुपयांपर्यंत दर ठेवण्यात आले आहेत. दोन डझन पेटीसाठी 25 पासून 110 रुपये दर आहे.